पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वीचे दोन महाराज म्हणजे खंडेराव आणि मल्हारराव यांना अशा कलांना देता येण्याइतका वेळ नव्हता. सयाजीराव तिसरे बडोद्याचे महाराजा झाले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की, बडोद्याचे संगीतघराणे नष्ट होत आले आहे. महाराज गणपतरावांच्या काळी शेकडो संगीतकार आणि नट गायकवाड संस्थानिकांच्या आश्रयाखाली जगत होते. आता ही संख्या कमी कमी होत जाऊन मोठ्या मुश्किलीने डझनावर येऊन पोहोचली होती.
 गायनकला ही ललितकलेत प्रमुख कला मानली जाते. गायन कलेला महाराजांनी आपल्या कारकीर्दीच्या आरंभापासून उत्तेजन दिलं होतं. तिला आपल्या राज्यात व्यवस्थित स्वरूप देण्याचा प्रयत्न महाराजा सयाजीरावांनी केला होता. तथापि तिचा प्रसार अधिक विस्तृत प्रमाणावर होण्यासाठी व भिन्न भिन्न संगीत संप्रदायांच्या तज्ज्ञांना एकत्र आणवून त्यांना परस्परांशी विचारविनिमय करण्याची संधी देण्यासाठी महाराजांनी इ.स. १९१६ च्या मार्च महिन्यात अखिल भारतीय संगीत परिषदेची बैठक बडोद्यास भरविली होती. सयाजीरावांनी आपल्या पदरी राजाश्रय दिलेले कलाकार या संगीत संमेलनात सहभागी होऊ शकले होते.

 कलाकारांना आश्रय आणि प्रोत्साहन देऊन सयाजीराव थांबले नाहीत, तर त्यांनी कलेला समजून घेण्याचे, कलेची कदर करण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे काम जाणीवपूर्वक केले.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / १९