पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजा सयाजीराव
आणि
बालगंधर्व

 सुभाषितकारांनी मनुष्याच्या संस्कृतीचे चिन्ह म्हणून साहित्य, संगीत आणि कला यांचे अस्तित्व त्याच्या ठिकाणी वर्णिले आहे. ही संस्कृती महाराजांनी आपल्या आयुष्यक्रमात वर्तनाने सार्थ करून दाखविली आहे. बडोदे राज्यात अभिवृध्दीला उत्तेजन देण्याचे कार्य काही अपरिचित नव्हते. सयाजीराव महाराजांच्या पूर्वी होनाजी बाळा, सगनभाऊ या प्रसिध्द शाहिरांना बडोद्याच्या तत्कालीन अधिपतींची पुष्कळ मदत होती. प्रसिध्द कवी, शाहीर अनंत फंदी हे बडोद्याचे वतनदार होते. त्यांचे नातू स्वतः आख्या रचून बडोद्यास कीर्तने करीत असत. त्यांचे दहा-बारा वर्षांचे दोघे नातू नवीन पोवाडे लिहू लागले. लिहिलेले पोवाडे महाराजांसमोर गाऊ लागले होते. खंडेराव महाराज हेही अशा गुणी कलाकारांना चांगला आश्रय देत असत. त्यांच्यानंतर मातु:श्री जमनाबाईसाहेबांनी ही परंपरा चालू ठेवली.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / ६