पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पुतळ्याच्या अनावरण समारंभातील भाषणात, बुद्धाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करताना महाराज म्हणतात, “महात्मा बुद्धांच्या उपदेशाचे सार एवढे होते की, मनुष्याला चांगली स्थिती प्राप्त होणे हे त्याचे नशीब किंवा दैवयोग यावर नसून, माणसाच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. आपण जसे कर्म करावे, जसा प्रयत्न करावा, त्या प्रयत्नाप्रमाणे लहानमोठे होऊ शकतो. बौद्ध सिद्धांताप्रमाणे ब्राह्मण-क्षत्रियादिवर्ण गुणकर्मावर समजला जातो. जन्मावरून नाही.” महाराजांचे हे भाषण त्यांच्यातील समतावादी कृतिशील राजाचा परिचय करून देते. महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध सर्व भारतीय धर्मात सयाजीराव बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानातील वैज्ञानिक दृष्टीशी नाते जोडत होते याचा स्पष्ट पुरावा यातून मिळतो. महाराजांच्या भाषणांमध्ये वारंवार बुद्धाचे संदर्भ येतात. यावरून महाराजांना बौद्ध धर्म किती महतत्त्वाचा वाटत होता हे लक्षात येते.

 बडोदा संस्थानात संस्थानातर्फे अधिकृतरीत्या बुद्धजयंती साजरी केली जात होती. बाबासाहेबांचा १९९३ पासून बडोद्याशी असणारा प्रत्यक्ष संपर्क विचारात घेता या पुतळ्यानेसुद्धा बुद्धाच्या समतावादाकडे नेणारी पायवाट बाबासाहेबांच्या उमेदीच्या वयात तयार केली होती असे दिसते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठीच्या ग्रंथखरेदीसाठी बाबासाहेब सिद्धार्थ कॉलेजच्या ग्रंथपालांना बडोद्याला पाठवत असल्याचे संदर्भ त्यांच्या चरित्रात सापडतात.

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ९