पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादाभाई नौरोजींना निवडणूक खर्चासाठी १५,००० रुपयांची मदत केली. या निवडणुकीत दादाभाई नौरोजी विजयी झाले; परंतु पक्षाने पक्षनिधी म्हणून पुन्हा १५,००० रु.ची मागणी केली. दादाभाई इतकी मोठी रक्कम देऊ शकत नसल्याने पक्ष सदस्यत्व सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सयाजीरावांना ही बाब कळताच त्यांनी पुन्हा दादाभाईंना १५,००० रु. दिले. सयाजीराव गादीवर येण्यापूर्वी मल्हारराव गायकवाडांच्या कारकिर्दीत दादाभाई नौरोजी हे बडोद्याचे दिवाण होते, तर दादाभाईंचे नातू जाल नौरोजी यांना सयाजीरावांनी बडोदा संस्थानात नोकरी दिली.

 १८९५ ला पुण्यात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला महाराजांनी २,००० रु.ची मदत केली. १८९७ मध्ये लंडनच्या वेल्वी कमिशनसमोर भारताची बाजू मांडण्यासाठी तीन सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले. या सदस्यांमध्ये गोपाळ कृष्ण गोखलेंचादेखील समावेश होता. इंग्लंडला जाण्यापूर्वी गोखलेंनी सयाजीराव महाराजांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाराजांनी गोखलेंना प्रवासखर्चासाठी २,५०० रु. दिले. १९०२ व १९०६ चे काँग्रेस अधिवेशन अनुक्रमे अहमदाबाद व कलकत्ता येथे झाले. या दोन्ही अधिवेशनावेळी काँग्रेसने भरवलेल्या उद्योग व सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १०