पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंमलबजावणीसाठी दामू अण्णा जोशींना पुण्याहून दिल्लीला पाठविले होते. या योजनेमागे अरविंद घोष आणि बाळ गंगाधर टिळक होते; परंतु काही कारणास्तव बॉम्ब फेकण्याची ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.

 मिरवणुकीतील सयाजीरावांच्या गैरहजेरीची चर्चा संपूर्ण दिल्लीत सुरु झाली. दरबाराच्या दिवशी प्रकृती अस्वास्थ्य बेचैन सयाजीराव दरबारात पोहोचले. व्हॉइसराय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या स्वागतपर भाषणानंतर बादशहा पंचम जॉर्ज यांना मुजरा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हैदराबादच्या निजामांनंतर दुसरा क्रमांक सयाजीराव महाराजांचा होता. बादशहा पंचम जॉर्ज समोर मुजरा केल्यानंतर महाराज दोन पावले मागे येऊन वळले आणि जागेवर परतले. सयाजीरावांच्या मुजऱ्याची ही पद्धत दरबारी रीतीला धरून नव्हती.

 या प्रसंगानंतर गोपाळ कृष्ण गोखले महाराजांना भेटले. ते महाराजांना म्हणाले, “महाराज, आपण बादशहांना मुजरा ठरल्याप्रमाणे केला नाही आणि महाराणीस तर मुजराच केला नाही. दोघांना पाठ दाखवून परतला. ठरलेला दरबारी पोशाख, आभूषणे, सन्मानचिन्हे अंगावर न घालता मुद्दाम साध्या पांढऱ्या पोशाखात आलात, असे गंभीर आरोप तुमच्या विरुद्ध सुरू आहेत. परिस्थिती आणखी चिघळण्यापूर्वी आपण व्हॉइसराय यांना पत्र देऊन खुलासा करावा.” गोखले गेल्यानंतर महाराणी

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २४