पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालेलकर ऊर्फ मामा कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, तर पांडुरंग बापट यांनी विद्यार्थ्यांना बॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया शिकवली होती. हेच बापट पुढे सेनापती बापट म्हणून प्रसिद्ध झाले.

  या विद्यालयात राष्ट्रप्रेम, शारीरिक शिक्षण, सांस्कृतिक वारसा, शस्त्रांची उपासना यांची शिकवण आणि स्फोटके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाई. त्याचबरोबर देशभरातील राष्ट्रीय विचारांच्या देशभक्तांना येथे बोलावून त्यांच्या भाषणांचे आयोजनही केले जात असे. थोड्याच कालावधीत हे विद्यालय राष्ट्रीय चळवळीचे प्रमुख केंद्र बनले; परंतु ब्रिटिश सरकारला हे विद्यालय राजद्रोह वाटू लागले. हिंदुस्थानच्या गुप्तचर विभागाचा अहवाल गव्हर्नर जनरलपर्यंत पोहोचला. १९११ ला लॉर्ड हार्डिंग्जने सयाजीरावांविरुद्ध ब्रिटनच्या भारत मंत्र्यांच्या सचिवास आरोपपत्र पाठविले. ब्रिटिश सरकारच्या वाढत्या दबावामुळे डिसेंबर १९११ मध्ये सयाजीरावांनी हे विद्यालय बंद केले.

माणिकराव आणि त्यांचा क्रांतिकारी आखाडा

 एके दिवशी सुरपारंब्या खेळणारा चपळ गजानन माणिक हा विद्यार्थी सयाजीरावांच्या दृष्टीस पडला. गुणग्राहक सयाजीरावांनी दुसऱ्याच दिवशी त्याला राजवाड्यात बोलावून बक्षीस म्हणून टोपी देऊन त्याचे कौतुक केले. हा गजानन माणिक जुम्मादादांच्या आखाड्यात जात होता. त्याचे गुरू जुम्मादादा

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २७