पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उल्लेख या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर येतो. विशेष म्हणजे या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे संपादक असणाऱ्या दीनबंधू पत्रात क्रमशः प्रकाशित झाले होते; परंतु फुलेंनी या ग्रंथात भारतातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीसाठी जबाबदार भारतातील ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच ब्रिटिश सरकारवरही सडकून टीका केली होती. ब्रिटिश सरकारचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून सत्यशोधक असणाऱ्या लोखंडेंनी या ग्रंथाचे क्रमशः प्रकाशन बंद केले. या पार्श्वभूमीवर सयाजीरावांचे उघडपणे या ग्रंथाला अर्थसहाय्य करणे किती हिमतीचे होते हे आपल्या लक्षात येईल. नुकताच राज्यकारभार हाती घेतलेल्या अवघ्या २० वर्षांच्या राजाने कारकीर्दीच्या आरंभीच इंग्रजांशी थेट भिडण्याची ही कृती अतिशय महत्त्वाची आहे.

 वर्तमानपत्रे, मासिके आणि विविध पुस्तके यांच्या माध्यमातून राजद्रोही लेखन करून सर्वसामान्यांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करणाऱ्या लेखकांना सयाजीरावांचे असणारे भक्कम पाठबळ समजून घेण्यासाठी नोव्हेंबर १९११ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज यांनी परराष्ट्र खात्याच्या सचिवांकडे सादर केलेले सयाजीराव महाराजांविरुद्धचे आरोपपत्र अतिशय उपयुक्त ठरते.

 या आरोपपत्रात लॉर्ड हार्डिंग्ज लिहितात, “बडोदा संस्थानात ब्रिटीश सरकारविरुद्ध वातावरण भडकावण्यात तेथील स्थानिक वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. १९०९ साली बडोदा संस्थानने

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३२