पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'पुढारी' वर्तमानपत्राच्या प्रकाशनास परवानगी दिली. या पत्रात सुरुवातीपासून जहालमतवादी दृष्टिकोनच समोर येत आहे. यांचे संपादक श्री. व्ही. पी. साठे आहेत. बडोदा सरकारने कळविले की, साठे यांच्या अशा विचारसरणीची संस्थानला कल्पना नव्हती. पुढे आम्ही फारच आक्षेपार्ह लेखांकडे सरकारचे लक्ष वेधले यावर महाराजांनी संपादकास फक्त समज दिली; पण पुढारीत आक्षेपार्ह ब्रिटिश सरकार विरुद्धचा मजकूर प्रकाशित होतच राहिला. मधल्या काळात दोन विद्रोही नाटकांचे प्रकाशन झाले. त्याचे लेखक आहेत संपादक साठे. या नाटकावर मुंबई सरकारने बंदी घातली. बडोद्यातील ‘चाबूक' नावाच्या दुसऱ्या वर्तमानपत्रातही आक्षेपार्ह लेख छापल्याबद्दल १९१० मध्ये आक्षेप घेण्यात आला. यानंतरही त्या पत्रात तसेच लेखन प्रकाशित होत राहिले. हिंदुस्थान सरकारच्या हस्तक्षेपाने शेवटी दोन्ही प्रकाशने थांबली. अलीकडे जानेवारी महिन्यात, बादशहाच्या हिंदुस्थान भेटीच्या संदर्भात टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर 'बडोदा गॅझेट'मध्ये प्रकाशित झाला. या पत्राविरुद्धही कोणतीही कारवाई बडोदा सरकारने केली नाही."

 सयाजीराव संस्थानातील राजद्रोही गोष्टींवर कोणतीही कारवाई करत नसल्याने ब्रिटिश सरकारने संस्थानात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी १६७ देशद्रोही ग्रंथ आणि पुस्तिका जप्त केल्या. या पुस्तकांमधील स्फोटक मजकूर तरुणांना ब्रिटिश सरकारविरुद्ध भडकावण्याचे

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३३