पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वसामान्यांचे सैन्य उभे केले. ब्रिटिश शासनाचे गुप्तहेर पाळतीवर असताना सयाजीराव महाराज आयुष्यभर त्यांना गुंगारा देत राहिले. आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान सयाजीरावांनी श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, केशवराव देशपांडे इ. क्रांतिकारकांना सातत्याने सक्रिय मदत केली.

 हबशी गुलामांद्वारे भारतात आलेल्या गनिमी काव्याच्या परंपरेचा विकास हबशी गुलाम असणाऱ्या मलिक अंबरने केला. हा गनिमी कावा त्याच्याकडून शहाजीराजांमार्फत शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांनी तो क्रांतिकारक पद्धतीने वापरला. या मलिक अंबरचे पहिले चरित्र मराठी भाषेत १९४१ साली बडोद्यातील सयाजी ग्रंथमालेत प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा कालानुरूप यशस्वीपणे वापरण्याचे श्रेय केवळ सयाजीरावांना जाते. कारण ५८ वर्षे ब्रिटिश गुप्तहेर पाठीवर घेऊन भारताच्या स्वातंत्र्यचळवळीला भक्कम मदत करणाऱ्या सयाजीरावांना 'राजद्रोही' ठरवणे ब्रिटिश सरकारला शेवटपर्यंत शक्य झाले नाही. याचे पुरावे लंडनच्या इंडिया हाऊसमधील सयाजीरावांसंदर्भातील गुप्त फायलींमध्ये आपल्याला मिळतात.

 सयाजीरावांसंदर्भातील अनेक गुप्त अहवाल ब्रिटिश सरकारने A Banded Box Case मध्ये सुरक्षित ठेवले. यातील कोणतीही फाइल आदेश दिलेल्या तारखेपासून पुढील ६० वर्षे कोणालाही बघता येत नव्हती. अगदी अभ्यासकांनाही या फायली उपलब्ध

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३९