पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होऊ शकत नव्हत्या. अलीकडच्या काळात आदरणीय बाबा भांड सरांनी स्वखर्चाने लंडनच्या इंडिया हाउसच्या लायब्ररीतून १८ A Banded Box Case फायली मोठ्या प्रयत्नांनी मिळवल्या आहेत. या फायलींमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आजवर अज्ञात राहिलेला इतिहास समोर येत आहे. या फायलींमधून समोर येणाऱ्या इतिहासातील काही घटनांची चर्चा अनिवार्य ठरते.

 १ मे १९९२ रोजी बडोद्याचे रेसिडंट एच. व्ही. कॉब यांनी बडोद्यातील सरकारविरोधी कार्याची माहिती देण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले. या पत्रात एक महिन्यापूर्वी बडोद्यातील सरकारविरोधी कारवाया रोखण्यासाठी सयाजीराव महाराजांनी उचललेल्या पावलांची माहिती देणारा अहवाल विभागाकडून मागवल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार सरकारविरोधी कारवायांच्या प्रकरणांमध्ये सयाजीरावांनी दीड वर्षापूर्वी कारवाई केली असून त्यानंतर त्याबाबतीत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे निरीक्षण कॉब यांनी नोंदवले आहे. के. जी. देशपांडे, साठे आणि एस. एल. बर्वे या तीन व्यक्तींना बडोदा संस्थानातून तात्काळ तडीपार करणे आवश्यक असल्याचे मत कॉब यांनी या पत्रात स्पष्टपणे नोंदवले आहे. कॉब यांनी उल्लेख केलेले के. जी. देशपांडे म्हणजेच केशवराव देशपांडे हे क्रांतिकारक आणि सयाजीराव

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४०