पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत महाराणी चिमणाबाईंनीसुद्धा गनिमी काव्याची झलक या गुप्तहेरांना दाखवली. नियोजित कार्यक्रमानुसार महाराणींनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता झुरीचसाठी प्रयाण करणे अपेक्षित होते; परंतु रेल्वे निघण्याच्या १५ मिनिटे आधी चिमणाबाईंनी आपल्या सेविकेच्या आजारपणाचे कारण देत ऐनवेळी हा दौरा रद्द केला. त्यानंतर १७ सप्टेंबर ला महाराणी चिमणाबाई आपल्या लवाजम्यासह पॅरिसला गेल्या. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी कुक नावाच्या एजंटने फर्स्ट क्लासची दोन, सेकंड क्लासचे एक तिकीट आणि मालवाहतुकीचे ३३ पॅकेज आरक्षित केल्या होत्या. परदेश प्रवासादरम्यान सयाजीराव आणि महाराणी चिमणाबाई यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेले हे प्रयत्न पाहता ब्रिटिश सत्तेने सयाजीरावांचा किती धसका घेतला होता हे स्पष्ट होते. या संदर्भात ब्रिटिश सरकारने १९०४ मध्ये स्थापन केलेल्या गुन्हेगारी गुप्तचर विभागाचा उद्देश आणि कार्यपद्धती जाणून घेणे गरजेचे आहे.

 १९०३ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी स्थापन केलेल्या पोलीस कमिशनच्या अहवालानुसार एप्रिल १९०४ मध्ये ब्रिटिश सरकारने सर हॅरॉल्ड स्टुअर्ट यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगार गुप्तचर विभागाची स्थापना केली. भारताची वासाहतिक सुरक्षा अबाधित ठेवणे आणि महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करणे या दोन जबाबदाऱ्या

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४२