पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तर या टिपणाच्या ३ महिने आधी ९ डिसेंबर १९१३ रोजी अन्य एक टिपण क्लीव्हलँड यांनी गुन्हेगारी गुप्तहेर विभागास सादर केले होते. युरोप दौऱ्यात सयाजीराव महाराजांनी मादाम कामा, कृष्णवर्मा आणि एस. आर. राणा या प्रसिद्ध जहालमतवादी व्यक्तींचा थेट संपर्क टाळला असला तरी अनुपचंद मेलपचंद शाह, खिमचंद लालुभाई बनकर आणि हिरालाल बनकर या क्रांतिकारकांची मात्र सयाजीरावांनी भेट टाळली नसल्याचे क्लीव्हलँड यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. या सर्व व्यक्ती मादाम कामा यांच्याशी संबंधित असून प्रत्येकासंदर्भातील वेगळे टिपण या टिपणासोबत पाठवत असल्याचे क्लीव्हलँड यांनी अखेरीस म्हटले आहे. क्लीव्हलँड यांनी हेच टिपण ब्रिटिश सरकारचे तत्कालीन परराष्ट्र सचिव श्री. वूड यांनादेखील पाठवले होते. विशेष बाब म्हणजे क्लीव्हलँड यांनी हे टिपण गुन्हेगारी गुप्तचर विभागाला सादर केल्यानंतर केवळ १० दिवसांनंतर ते A Banded Box Case फाइलमध्ये ठेवण्याचे आदेश विभागाने दिले.

 आधुनिक भारताच्या इतिहास लेखनात ज्यांनी जागतिक दबदबा निर्माण केला असे बिपीन चंद्र, सुमित सरकार, रणजीत गुहा, रामचंद्र गुहा यांसारख्या दिग्गज इतिहासकारांच्या इतिहास लेखनातसुद्धा सयाजीराव गायकवाड या नावाचा साधा उल्लेखसुद्धा ज्यावेळी होताना दिसत नाही तेव्हा आधुनिक भारताच्या इतिहासलेखनाच्या प्रचंड मर्यादा समोर येतात.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४६