पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
महाराजा सयाजीराव
आणि
भारताचा स्वातंत्र्यलढा


 आधुनिक भारताच्या जडणघडणीतील 'सयाजीपर्व' इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या अंगानेही पूर्णतः दुर्लक्षित राहिलेले आहे. अगदी १८८५ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते १९३९ मध्ये सयाजीरावांच्या मृत्यूपर्यंत देशातील मवाळ जहाल अशा दोन्हीही विचारधारांच्या स्वातंत्र्य प्रयत्नांना सयाजीरावांनी इंग्रजांच्या विरोधाला अजिबात न जुमानता सहकार्य केले. भारताबाहेर जगभरातील ब्रिटिश विरोधी आघाडीशी सयाजीरावांचा घनिष्ठ संपर्क होता. अगदी हिटलर - मुसोलिनीशी असणारा सयाजीरावांचा संवाद हा स्वातंत्र्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग होता. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहीत असताना तो सयाजीविरहित करणे म्हणजे 'जेवण मीठविरहित करण्या' सारखे आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा आणि सयाजीराव हा विषय २०१६ पर्यंत पूर्णतः दुर्लक्षित होता. परंतु बाबा भांड यांनी २०१६ मध्ये ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड' ग्रंथ लिहून हा विषय पहिल्यांदा चर्चेत आणला.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ६