पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारतातील ५६५ संस्थानिकांमध्ये सयाजीराव हे एकटे सार्वभौम राजे होते. इंग्रजांशी असलेल्या मैत्रीच्या करारामुळे त्यांचा दर्जा स्वतंत्र राजाचा होता. स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाचे केंद्र बडोदा होते. या चळवळीचे सूत्रधार अरविंद घोष हे महाराजांचे खासगी सचिव होते. बाळ गंगाधर टिळक यांना महाराजांनी पुण्यातील आपला गायकवाड वाडा इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी कागदोपत्री व्यवहार दाखवून भेट दिला. दादाभाई नौरोजी हे तर बडोद्याचे दिवाण होते. लंडनमधील इंडिया हाउस बांधण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांना महाराजांनी आर्थिक मदत केली होती. गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, मादाम कामा, तारकनाथ दास, बिपीनचंद्र पाल, दिनशा वाच्छा, बॅ. विनायक सावरकर, बाबाराव सावरकर इ. लोकांना सयाजीरावांनी आर्थिक सहाय्य केले होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे क्रांतिकारक बडोद्यात आश्रयाला आल्याचे पुरावे सापडतात. तर जवाहरलाल नेहरू लंडनमध्ये शिकत असताना रात्री १ वाजता गुप्तपणे सयाजीरावांना भेटल्याचे संदर्भ नेहरू समग्र वाङ्मयात सापडतात. यावरून दादाभाई नौरोजी ते पंडित नेहरू या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ पटावरील सयाजीरावांचा प्रभाव अधोरेखित होतो.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ७