पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यात काही सूचना किंवा लोकांचे प्रश्न निदर्शनास आल्यास त्यासंबंधी स्वत: चौकशी करून त्याची अंमलबजावणी करत असत. त्यामुळे लोकांमध्ये बडोदावत्सलविषयी आदर आणि आकर्षण निर्माण झाले.

 रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी लिहिलेल्या 'ईश्वरास प्रार्थना' या पुस्तकाचा प्रथम परिचय या पत्राने करून दिला. यंदे आणि आवटे दोघेही सत्यशोधक असल्याने या बडोदावत्सलमधून सत्यशोधकीय विचारांचा प्रचार-प्रसार सातत्याने करत होते. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर बडोदावत्सलने जोतीरावांना ७ डिसेंबर १८९० रोजी 'हिंदुस्थानातील मार्टिन ल्युथर' म्हणून श्रद्धांजली अर्पित केली होती. यावेळी लिहिलेल्या मृत्युलेखात फुल्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याची सर्वप्रथम मागणी बडोदावत्सलने केली होती. पुढे ७९ वर्षांनी १९६९ मध्ये महाराष्ट्र शासनाने फुल्यांचे समग्र वाड्मय प्रकाशित केले. याच asोदावत्सल प्रेसने १८९२ मध्ये सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह छापला होता. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर २४ मे १८९१ रोजी सत्यशोधक समाजाचे नामांतर सत्यधर्म समाज असे करण्यात आले. या नव्या सत्यधर्म समाजाचे 'सत्यप्रकाश' या नावाने मुखपत्र सुरू करण्यात आले होते. या सत्यप्रकाश मुखपत्रासाठी महाराजांनी आर्थिक साहाय्य केले होते.

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १३