पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
मराठी पत्रकारिता

 'वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे समाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्ये याबाबतचे शिक्षण दिले जाते' असे मत माध्यमतज्ज्ञ ए. ए. बर्जर यांनी मांडले आहे. प्रसार माध्यमांच्या विकासाच्या टप्प्यांचा आढावा घेतला तर वृत्तपत्र हे यातील मूलभूत माध्यम म्हणून गणले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांना स्थान दिले जाते. स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणाऱ्या वृत्तपत्रांपासून ते आजची '२४ x ७' चालणारी पत्रकारिता, पेनपासून कॉम्प्युटरपर्यंत, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंगपर्यंत, टी व्ही चॅनेल्सपासून ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्सपर्यंत अशा अमूलाग्र बदलांमधून पत्रकारितेचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास असाच वेगाने पुढेही अविरतपणे सुरू राहील.

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / ६