पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२३ च्या ऑगस्टपासून ते १९४४ च्या जुलैपर्यंत २१ वर्षे चालविले. ते स्वतंत्र राष्ट्रीय लोकशाही साप्ताहिक असल्याने त्याला गुजरात काठियावाड तसेच राजस्थानच्या इतर राज्यात प्रकाशित करता आले नसते. सयाजीरावांच्या उदार राष्ट्रीय राजनीतीमुळे ते २१ वर्षांपर्यंत निर्विघ्नपणे चालविता आले." याच राष्ट्रीय कार्यास पाठिव्याच्या भूमिकेतून १९०४ मध्ये सयाजीरावांनी पुणे येथील 'गायकवाड वाडा' बाळ गंगाधर टिळकांना केसरी व मराठा वृत्तपत्रांसाठी भेट दिला. परंतु ब्रिटिश रेसिडेंटचा याला विरोध होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी १५,४०० रुपयास व्यवहार झाल्याचे कागदोपत्री दाखवले. सध्या हा 'गायकवाड वाडा' 'केसरी वाडा' म्हणून ओळखला जातो.
बडोद्यातील नियतकालिके

 सयाजीरावांनी सत्यशोधक विचारप्रवाहातून निघणाऱ्या बडोदावत्सल, श्री सयाजीविजय, जागृति या नियतकालिकांना पाठबळ देत सत्यशोधक चळवळीला पूरक भूमिका घेतली. हा काही योगायोग नव्हता. सयाजीरावांनी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. बडोदा संस्थानात बडोदा गॅझेट, हिंदविजय, नवसारी प्रकाश, भारतमित्र इ. वर्तमानपत्रे विस्तारली होती. १८८५ साली 'विविधकलाविस्तार', १८८७

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / ९