पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिला 'व्यायामकोश' हा अद्वितीय कोश दहा खंडात प्रसिद्ध केला. महाराजांनी पाकशास्त्र अभ्यासासाठी नामदेवराव रामचंद्रराव कदम यांना युरोपला पाठवले. शिक्षण पूर्ण करून परतताच त्यांनी 'भोजनदर्पण' (१८९७) हा पाकशास्त्रावरील समृद्ध ग्रंथ लिहिला. महाराजांच्या हुकुमावरून बळवंतराव रामचंद्र मराठे यांनी 'सूपशास्त्र' या मराठी भाषेतील पुस्तकातून तंजावरी चालींच्या पदार्थांची माहिती करून दिली आहे.
मराठीतील पहिले ग्रंथ
 मराठीमध्ये स्वतंत्र अभ्यास संशोधन करून लेखन करणारे लेखक फारच कमी असल्यामुळे जगातील आधुनिक ज्ञान आपल्या प्रजेला मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणून महाराज भाषांतराकडे पाहात होते. १८८७ मध्ये महाराज जेव्हा पहिल्या परदेशवारीवर युरोपला गेले तेव्हा त्यांनी युरोपातून कॅसलचा ‘Dictionary of Cookery' हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवाणांना दिले. मनिलाल द्विवेदी यांनी या योजने अंतर्गतच पाटण येथील प्रसिद्ध जैन भांडारातील २१ ग्रंथांचे संशोधनात्मक भाषांतर केले होते. हीच भाषांतर शाखेची पहिली सुरुवात होय.

 १८९३ मध्ये सर हेनरी मेन यांच्या 'व्हिलेज कम्युनिटीज' या ग्रंथाचे बोडस यांनी केलेले 'प्राच्य व पाश्चात्य देशांतील ग्रामसंस्था' हे मराठी भाषांतर तसेच १८९७ मध्ये विल्यम मॉरीसन यांच्या 'क्राइम अँड इट्स कॉझिस' या इंग्रजी ग्रंथाचे 'गुन्हा 'आणि त्याची कारणें' हे रामचंद्र हरी गोखले यांनी केलेले

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / ११