पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठी भाषांतर ‘महाराष्ट्रग्रंथमाले'त प्रकाशित केले. १९२८ मध्ये ‘Tribe and Caste Of Bombay' या पुस्तकाचे मराठी भाषांतर गोविंद मंगेश कालेलकर यांच्याकडून करून घेऊन 'मुंबई इलाख्यातील जाती' या नावाने सयाजीसाहित्य मालेत प्रकाशित केले.
 प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून १९०३ मध्ये भिकाचार्य ऐनापुरे यांच्याकडून 'प्रायश्चित्तमयूख' हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर या स्वरूपात तयार करवून प्रकाशित केला. हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्मसाक्षरता अभियानाचा उत्तम नमुना आहे.

 १९९५ मध्ये 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' ही संशोधनात्मक प्रकाशनमाला सुरू करण्याचे निश्चित केले. १९१६ मध्ये राजशेखरकृत 'काव्यमीमांसा' हा या मालेतील पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. या मालेसाठी पाली भाषेतील बौद्ध धर्मावरील 'दीघनिकाय' ग्रंथाचे मराठी भाषांतर चिंतामण वैजनाथ राजवाडे यांनी केले. श्रावणमास दक्षिणेवर होणारा अवाजवी खर्च कमी करून झालेल्या बचतीतून दरवर्षी १० हजार रुपये धर्मशास्त्राच्या भाषांतरित पुस्तकांवर खर्च करण्याचे आदेश सयाजीरावांनी दिले. यातूनच “श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू” हा अष्टभाषी राज्यव्यवहार कोश प्रसिद्ध झाला.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १२