पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शाहू गुरुस्थानी मानत होते. सयाजीराव आणि शाहू महाराज यांना जोडणारा दुवा अशीच खासेराव जाधवांची भूमिका होती.
 शाहूंनी महाराजांशी पत्रव्यवहार करून बडोद्याच्या विविध कायद्यांची मागणी केल्याचे पुरावे सापडतात. बडोद्याचा प्राथमिक शिक्षण कायदा शाहूंनी जसाच्या तसा कोल्हापुरात राबविला तसेच जमीन सुधारणा कायद्याचीही मागणी महाराजांकडे केली. बडोद्यातील शिक्षण खात्यातील पंडित आत्माराम हे बडोद्याच्या सेवेतून कोल्हापुरातील शैक्षणिक काम पाहण्यासाठी हवे असल्याचे पत्र शाहूंनी सयाजीरावांना लिहिले होते. सयाजीरावांचे आर्थिक पाठबळ मिळालेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या ३२ व्यक्ती कोल्हापुरात महत्त्वाच्या पदांवर होत्या. यावरून असे दिसते की शाहू महाराजांच्या कार्याला बडोदा आणि सयाजीरावांकडून मिळालेली प्रेरणा, नैतिक पाठबळ आणि सहकार्य हे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे ठरले आहे.
बाबासाहेबांचे हितचिंतक

 डॉ. आंबेडकरांच्या भीमराव ते बाबासाहेब या प्रवासातील खरे वाटाडे म्हणजे सयाजीराव महाराजाच होते. महाराजांनी बाबासाहेबांना पदवी शिक्षणासाठी ५ वर्षांसाठी दरमहा २५ रु. शिष्यवृती मंजूर केली. तसेच अमेरिकेस उच्च शिक्षणासही

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २२