पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठविले. १९०८-१९१७ अशी सलग ९ वर्षे संपूर्ण शिक्षणासाठी आर्थिक साहाय्यही केले. १९३१ साली दुसऱ्या गोलमेज परिषदेवेळी महाराजांनी आंबेडकरांना अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी १५० पौंडांची आर्थिक मदतही केली. बाबासाहेबांना वेळोवेळी महाराजांनी केलेली ही आर्थिक मदत आजच्या मूल्यात ४ कोटी ९४ लाख २३ हजार ८३९ रुपये इतकी भरते.
 घटनासमितीचे सदस्य म्हणून काम करत असताना महाराजांसमोर बडोद्यातील कायद्यांचा नमुना होता. जगातील एकमेव अशा पुरोहित कायद्याचा तसेच बडोद्यातील हिंदू कोड बिलाचा उपयोग घटना निर्मितिवेळी बाबासाहेबांकडून करण्यात आला. सयाजीरावांच्या या कायद्यांनी भारतीय राज्यघटनेस नक्कीच ऊर्जा पुरवली.

 १९३९ रोजी झालेल्या महाराजांच्या मृत्यूनंतर 'जनता' या वृत्तपत्रातील मृत्युलेखात आंबेडकर लिहितात, “सयाजीराव महाराजांच्या निधनाने माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे मला आजची योग्यता प्राप्त झाली आहे. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही.” त्यामुळेच डॉ. आंबेडकरांच्या भीमराव ते बाबासाहेब म्हणून घडलेल्या प्रवासामागे महाराजांची असणारी दूरदृष्टी योगदान लक्षात घेऊन सयाजीराव आणि आंबेडकर हे नाते नव्याने अभ्यासने गरजेचे आहे.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २३