पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्राच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान दिले आहे. दुर्दैवाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराजांच्या या योगदानाचा उल्लेख आढळत नाही.
 या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच सयाजीराव महाराजांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १९३३ मध्ये पुण्यातील नगरवाचन मंदिर, मराठी ग्रंथ संग्रहालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल महाराष्ट्र साहित्य मंदिर आणि कोल्हापूरमधील महाराष्ट्र साहित्य संमेलन कचेरी अशा ७४ सार्वजनिक संस्थांतर्फे महाराजांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार म्हणजे महाराजांच्या महाराष्ट्रीयन ग्रंथालय चळवळीला असणाऱ्या अपूर्व योगदानाचा भक्कम पुरावा आहे.
लेखक सयाजीराव

 इतरांकडून चांगले वाङ्मय तयार करून घेत असतानाच महाराज स्वतःसुद्धा दर्जेदार लेखन करत होते. एडवर्ड गिब्बनच्या 'रोमन साम्राज्याचा उत्कर्ष व -हास' या ग्रंथाचा सयाजीरावांनी लिहिलेला इंग्रजी टीका ग्रंथ From Caesar To Sultan' या नावाने प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे 'कैसरकडून सुलतानकडे ' हे मराठी भाषांतर राजारामशास्त्री भागवत यांनी केले. सयाजीरावांचा १९०१ साली प्रकाशित दुष्काळ निवारणासंदर्भात उपाय सुचवणारा 'Notes On The Famine Tour' हा ग्रंथ म्हणजे कोणत्याही भारतीय प्रशासकाने दुष्काळावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २५