पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि मांडलेली भूमिका किती द्रष्टी होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तुकारामाचे अभंग संगतवार लावून प्रसिद्ध केल्यास तो एक जागतिक महत्त्वाचा अपूर्व ग्रंथ होईल असे जेव्हा महाराज सांगतात तेव्हा तुकारामाच्या तत्त्वज्ञानाच्या वैश्विक मूल्याचे महाराजांचे भान किती प्रगल्भ होते याचा पुरावा मिळतो.
मराठी भाषेचे 'खरे' शिवाजी
 मराठीतील एक महत्त्वाचे साहित्यिक आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे यांनी अत्यंत मार्मिकपणे मराठी साहित्य आणि सयाजीराव यांचे नाते अधोरेखित केले आहे. नेमाडे म्हणतात, “आपली भाषा ज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर असावी, असे सर्वांनाच वाटते. परंतु यासाठी सत्तेवरच्या लोकांना आणि विद्याक्षेत्रातल्या लोकांना सतत कष्ट उपसावे लागतात. विद्याक्षेत्रातल्या सुखवस्तू होऊन आळशी बनलेल्या लोकांना ज्ञानग्रंथ निर्माण करण्याच्या मेहनती कामाला लावणे किती कठीण असते. सयाजीरावांनी हा सर्व प्रयोग यशस्वी करून शेकडो ग्रंथ मराठीत निर्माण केले. मातृभाषेचा एवढा जिव्हाळा त्यांच्यानंतर सत्तेवरच्या दुसऱ्या कोणी मराठी माणसाने दाखवलेला नाही."

 मराठी भाषेचे शिवाजी ही उपाधी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मोठ्या अभिमानाने लावली जाते. चिपळूणकरांनी संस्कृतप्रचुर मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यांचा हा आग्रह ब्राह्मणांचे वर्चस्व आणि बहुजनांचे दुय्यमत्व अधोरेखित

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २७