पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिनिधींबरोबर धारा सभेत बसण्याची तयारी असणाऱ्या सर्वसाधारण सदस्यांनाच धारा सभेची निवडणूक लढण्याची परवानगी देणारा नियम केला. हा नियम खास बाबासाहेबांना धारा सभेवर नेमण्यासाठी केला होता हे विशेष. गांधींनी आयोजित केलेल्या अस्पृश्य परिषदेच्या यशाला सयाजीरावांच्या या दीर्घकालीन प्रयत्नांची मौलिक पार्श्वभूमी लाभली होती.

 गांधींच्या या अस्पृश्योद्धाराच्या कार्याबद्दल सयाजीरावांना आपुलकी होती. १९२३ मध्ये बडोद्यात केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, “आम्ही अस्पृश्य बांधवांना समता आणि बंधुत्व ही मानवी मूल्ये नाकारत आहोत. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची माणसे या सामाजिक प्रश्नांसाठी फार मोठे काम करत आहेत. जर आम्ही महात्मा गांधींचा सल्ला आणि मार्गदर्शन यांचे अनुकरण केले नाही, तर आपणास फार मोठ्या पश्चात्तापास सामोरे जावे लागेल.” ज्या काळात गांधींचे नाव उच्चारणे हा गुन्हा ठरत असे त्या काळात सयाजीरावांनी जाहीर भाषणात गांधींचे अनुकरण करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ही बाब स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना म्हणून विचारात घ्यावी लागते. या भाषणामुळे ब्रिटिश सरकारच्या गोटात खळबळ उडाल्यानंतर गांधींच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची आपण स्तुती केल्याचा 'खुलासा ' महाराजांनी केला.

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १२