पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणत्याही अपमानकारक अनुभवाशिवाय सयाजीरावांमधील समाजक्रांतिकारक राष्ट्र उन्नतीच्या विशाल ध्येयातून विकसित झाला.
 महाराजा सयाजीराव-राजर्षी शाहू : तुलनात्मक 'आकलन'
 सयाजीराव महाराज आणि राजर्षी शाहू या दोन महान राजांची तुलना महाराष्ट्रातील शाहू प्रेमींना कदाचित अतिरेकी आणि अनावश्यक वाटेल परंतु महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा समजून घेण्यासाठी ती अनिवार्य ठरते. या दोन्ही राजांचा तुलनात्मक अभ्यास फार पूर्वीच व्हायला हवा होता. परंतु सयाजीरावांना ‘बडोद्याचे' म्हणून आम्ही दुर्लक्षित ठेवले. दोघांकडेही काम केलेल्या वि. द. घाटे या शिक्षणतज्ज्ञाने त्यांच्या 'दिवस असे होते' या आत्मकथनात या दोघांची अत्यंत चित्तवेधक तुलना केली आहे. अलीकडे शाहू गौरव ग्रंथासाठीच्या लेखात बाबा भांड यांनी घाटेंच्या तुलनेचा अधिक विस्तार त्यांनीच शोधलेल्या नव्या संदर्भांच्या आधारे केला आहे. प्रस्तुत तुलना ही मुख्यतः पुरोगामी महाराष्ट्राचे ऊर्जाकेंद्र बडोदा कसे होते हे शोधणे या मर्यादित भूमिकेतून आणि या दोघांचे बोट धरून केली आहे.

 या तुलनात्मक शोधाच्या आरंभी वि.द. घाटे यांनी या दोघांच्या स्वभावाच्या अंगाने केलेली तुलना विचारात घेऊ. वि.द. घाटे म्हणतात, “शाहूमहाराज आणि सयाजीराव महाराज हे दोघे राजपुरुष बरेचसे समकालीन. दोन्हीही मोठी माणसे; परंतु दोघात फार फरक होता. पहिले दहा - दहा तास उन्हातान्हात घोड्यावर

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १०