पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




बसून डुकरांचा माग काढायचे, तर दुसरे दहा दहा तास नव्या नव्या शास्त्रांवरील ग्रंथांचे श्रवण करीत जागरण करायचे. एखादा प्रश्न डोकावला रे डोकावला की पहिले त्याला ताबडतोब कार्यवाहीत आणायचे. दुसरे स्वतःचे मत निश्चित असले तरी चार तज्ज्ञांची कमिटी नेमायचे. त्यांना पुरेसा वेळ द्यायचे. त्यांचा अहवाल सावकाश वाचायचे. चर्चा करायचे आणि मगच निर्णय घ्यायचे. सयाजीरावांपाशी जन्म काढलेले माझे मित्र मला थट्टेने नेहमी सांगत, एखाद्या माणसाने राजवाड्यात येऊन, समोर उभे राहून महाराजांना शिव्या दिल्या असत्या तर सदर इसमाने खरेच शिव्या दिल्या का, दिल्या असल्यास त्या किती वाईट होत्या, शिव्या वाईट असल्यास सदर इसमास काय शिक्षा करावी, हे ठरविण्यासाठी महाराजांनी एखादी कमिटी नेमली असती.” वि.द. घाटेंचे हे विश्लेषण वाचल्यानंतर या दोघांच्या स्वभावातील दोन टोकांचे आपल्याला दर्शन घडते.

 वि.द. घाटेंनी पुढे ही तुलना अधिक मूलभूत पातळीवर नेली आहे. शाहूंना ते कर्मवीर म्हणतात तर सयाजीरावांना तत्त्वचिंतक. ही तुलना अत्यंत रंजक तर आहेच आहे परंतु दोघांच्या कार्याचा वैचारिक पाया स्पष्ट करणारीही आहे. घाटे म्हणतात, “पहिले कर्मवीर तर दुसरे तत्त्वचिंतक. पहिले कर्मठ मराठा- हिंदू होते. क्षत्रियत्त्वाचा अभिमान बाळगणारे, मरेपर्यंत सकाळी भक्तिभावाने (विलायत च्या थंडीतसुद्धा) शिवपूजा करणारे होते, तर दुसरे अज्ञेयवादी, बुद्धीखेरीज कशावरच विश्वास न ठेवणारे;

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ११