पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वि.द. घाटे आपल्या आत्मचरित्रात या दोघांची तुलना करताना शेवटी जे म्हणतात ते फार महत्त्वाचे आणि आपल्या पुढील विवेचनासाठी मार्गदर्शक आहे. घाटे म्हणतात, “तसे पाहिले तर शाहूमहाराजांनी जे जे केले ते सारे सयाजीराव महाराजांनी केले. इतकेच नव्हे तर त्यांच्यापूर्वीच केले. वेदोक्त सयाजीराव महाराजांनीच सुरू केले. शाहू महाराजांनी पुढे ते धसास लावले. सयाजीरावांनी आपल्या पंक्तीला अस्पृश्यांना घेतले. त्यांना नोकऱ्या दिल्या. आंबेडकरांच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला; परंतु हे सारे केले ते अलिप्त वृत्तीने. आपल्या विशाल कार्यक्षेत्रातील आणि विशालतर जीवनातील केवळ एक भाग याच भावनेने आणि दृष्टीने. साहजिकच सयाजीरावांच्या सामाजिक किंवा जातीय कार्याचा गाजावाजा झाला नाही आणि त्यांच्यावर टीकेचा वर्षावही झाला नाही."
 वि.द. घाटेंनी दोघांच्याही कार्याचे ऐतिहासिक मूल्यमापन केले आहे. कोल्हापुरातील अनेक सुधारणांचा उगम सयाजीरावांच्या धोरणात होता. याचे अनेक पुरावे शाहू महाराजांनी बडोद्याशी केलेल्या पत्रव्यवहारात सापडतात. परंतु या संदर्भात चर्चा मात्र झालेली नाही. ही चर्चा दोघांपैकी कोण श्रेष्ठ हे ठरविण्यासाठी नाही, पुरोगामी धोरणांच्या अंमलबजावणीत परस्पर पाठबळाची गरज असते. ही गरज इतिहासात कशी भागवली गेली होती हे तुलनेशिवाय समजत नाही. हे समजण्यासाठीच ही तुलना केली आहे. शाहू महाराजांना सयाजीराव वडीलधारे होते.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १३