पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्याधिकार प्राप्त झाल्यापासूनच (१८८१) सयाजीरावांचा महाराष्ट्रातील सुधारणावादी महापुरुषांशी नियमित संपर्क होता. मामा परमानंद, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, डॉ. भांडारकर, गंगारामभाऊ म्हस्के, न्यायमूर्ती चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे इ. सर्व समाजसुधारकांशी सयाजीरावांचा सातत्याने संवाद होता. महात्मा फुले यांनी समाजसुधारणेविषयी जो कार्यक्रम तयार केला होता तो महाराष्ट्राअगोदर सयाजीरावांनी बडोद्यात फक्त राबविलाच असे नाही तर फुल्यांच्या अपेक्षेपेक्षाही व्यापक केला.

 वि.द. घाटेंप्रमाणेच बाबा भांड यांनी सयाजीराव आणि शाहू यांची तुलना करून काढलेला निष्कर्ष वरील मांडणीची पाठराखण करताना दिसतो. बाबा भांड म्हणतात, “महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू हे दोघेही समाजपुरुष लोककल्याण आणि समाजसुधारणांसाठी उत्तम प्रशासनाचा आदर्श होते, बुद्धिवादी होते, नवीन प्रयोग करण्यास मागे-पुढे पाहत नसत. सयाजीरावांचा मदतीचा हात अधिक मोकळा होता. वेगवेगळ्या जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचा शाहूंचा प्रयत्न हे चांगले उदाहरण सांगता येईल. शाहू छत्रपतींचे ब्रिटिश सरकारांशी असलेले मित्रत्वाचे संबंध आणि वागणे त्यांच्या समतोल व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. याउलट, एक व्यासंगी, विद्वानांच्या संगतीत वावरणारे आणि जगभर फिरलेले स्वाभिमानी सयाजीराव महाराज ब्रिटिशांची रणनीती पुरती

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १४