पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओळखून आयुष्यभर संयमाने सरकारशी संघर्ष करत राहिले. हे करत असताना त्यांनी रयतेच्या कल्याणाचा चोवीस तास ध्यास घेतला. साहित्य, कला, संस्कृती, उद्योग, शेती आणि प्रशासनात बडोदा हे हिंदुस्थानातील अग्रगण्य संस्थान बनवले. शाहू महाराजांच्यापूर्वी महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीकडे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी लक्ष दिले.

 राजर्षी शाहू आणि महाराजा सयाजीरावांची पिंड व प्रकृती मूलतः भिन्न होती. राजर्षी शाहू एखादी गोष्ट करताना एकदम धडक मारत, टक्कर घेऊन प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडी चीत करण्याची पहिलवानी शक्ती वापरत. याउलट, सयाजीराव महाराज एखादा निर्णय घेताना चार तज्ज्ञांचे मत घेत, त्यांच्याकडून अहवाल मागवत, स्वतः त्याचा विचार करून समतोल निर्णय घेत. तरीसुद्धा विद्याप्रसारक चळवळीचे सयाजीराव पहिले आश्रयदाते झाले. पुढे सयाजीरावांच्या कार्यात शाहू महाराजांनी भर घातली. सयाजीरावांचे धोरण सामिलकीचे असल्याने कट्टर हिंदुत्ववादी सावरकरवादी, फुल्यांचे सत्यशोधक, आर्यसमाजाचे, बुद्धिस्ट आणि पुरोगामी विचारांची माणसे त्यांच्याकडे नोकरीला होती. या सर्वांना बरोबर घेऊन सयाजीराव महाराजांनी सामिलकीच्या धोरणाचा पुरस्कार केला. महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाला गौरव आणि अभिमान वाटावा असे या दोघांचे कार्य आहे."

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १५