पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या प्रयोगाचा विस्तार केला. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांची परिपूर्ण तयारी करून त्यानंतर १३ वर्षांनी १९०६ मध्ये आपल्या संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माच्या मुलामुलींकरिता मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा सयाजीरावांनी अमलात आणला.
 शाहू महाराजांनी त्यांच्या धडाकेबाज स्वभावाला धरून १९१८ मध्ये प्रथम कोल्हापूर शहर आणि लगेचच संपूर्ण संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा अमलात आणला. पण बहुधा आर्थिक अडचणींमुळे तो फक्त मुलांसाठी लागू केला. मुलींना या कायद्याचा लाभ झाला नाही. या उदाहरणावरून दोघांच्या कार्यपद्धतीतील फरक स्पष्टपणे अधोरेखित होतो. यासंदर्भात रमेश जाधव महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात, “...मुलांच्या सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणावर शाहू छत्रपतींनी जितके लक्ष केंद्रित होते तितके लक्ष त्यांनी मुलींच्या शिक्षणावर केंद्रित केल्याचे दिसत नाही. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्यातून मुलींना वगळण्यात आले होते."

 १९१८ ला सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर पुढच्याच वर्षी शाहू महाराजांनी १९१९ ला संस्थानातील अस्पृश्य शाळा बंद करून स्पृश्य अस्पृश्यांच्या सहशिक्षणाचा धडाकेबाज निर्णय घेतला. याउलट बडोद्यात मात्र १८८२ पासून ते सयाजीरावांच्या निधनापर्यंत अस्पृश्यांच्या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १८