पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८९२ मध्ये पुन्हा जोधपूर येथे रजपूतांमध्ये धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने होत असल्याचे पाहिल्यानंतर सयाजीरावांनी या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या राजवाड्यातील देवघर प्रमुख राजारामशास्त्री टोपलेंपासून रियासतकार सरदेसाईंपर्यंत विविध धर्म जाणकारांशी चर्चा करून स्वत:ची बौद्धिक तयारी झाल्यानंतरच त्यांनी अंमलबजावणीच्या दृष्टीने पाऊले उचलली. ब्राह्मण शास्त्री वेदोक्तास टाळाटाळ करतात हे पाहून १८९५ ला पहिल्यांदा अप्पासाहेब मोहिते या मराठ्याची खानगी कारभारी म्हणून नियुक्ती केली. वेदोक्ताचा निर्णय घेतल्यानंतर होणारा संघर्ष आणि गोंधळ टाळण्याची ही पूर्वतयारी होती.
 त्यानंतर १८९६ च्या दसऱ्यापासून राजवाड्यावरील सर्व विधी वेदोक्त पद्धतीने होतील असा आदेश सयाजीरावांनी त्यांच्या मसुरी स्वारीतून काढला. या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांनी अप्पासाहेब मोहिते यांच्यावर सोपवली. १८९६ पासून बडोद्यात वेदोक्त विधीचे धोरण प्रसंगी पुरोहित बदलून सयाजीरावांनी रीतसर सुरू केले. १८९८ ला आपल्या युवराजांच्या मुंजीसुद्धा त्यांनी वेदोक्त पद्धतीने केल्या. राजवाड्यातील मंदिराचा खर्च असो किंवा दानधर्माच्या नावाखाली होणारी पैशाची उधळण असेल, हे सर्व सयाजीरावांनी शांतपणे आणि शिस्तबद्धरीत्या नियंत्रणात आणले.
 वेदोक्त प्रकरणावेळी बडोद्यात उद्भवलेली परिस्थिती विशद करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, "इकडे प्रथम

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २१