पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेदोक्तकर्म करण्याचे शास्त्रीबुवांनी कबूल केल्यावर त्यात सामील होण्याची प्रत्यक्ष पाळी आली; तेव्हा त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते बडोद्यानजीक छाणी गावी जाऊन राहिले. अर्थात या राजीनाम्याने गावात मोठी चळवळ उडाली. जुन्या पक्षाचे अध्वर्यू असे जाहीर झाले. गावात या प्रश्नाची उघड उघड चर्चा होऊ लागली. सुधारक व प्रतिगामी असे दोन तट गावात उपस्थित झाले. शास्त्री, वैदिक वगैरे मंडळींनी सभा भरवून या प्रश्नाची चर्चा जोराने सुरू केली आणि काही झाले तरी देवघरात पूर्वीचे पुराणोक्तच चालू राहावे, वेदोक्त चालू होऊ महाराजांनी हुकूम केला तरी तो मानू नये, असा शहरांतील बहुतेक मंडळींनी आग्रह धरला. श्रावणमास दक्षिणेसाठी येणाऱ्या बाहेरच्या मंडळींनी बडोद्यास येऊ नये अशीही खटपट करण्यात आली. असा विरोध पाहताच महाराजांसही आपला बोज व हुकुमत राखण्याची आवश्यकता विशेष भासू लागली.

 योग्य वाटते ते कोणासही न भीत करावयाचे हे राजाचे पहिले कर्तव्य असत, त्याविषयी केवळ लोकांस खुश करण्याकरिता माघार घेणे शक्य नव्हते. याच सुमारास त्यांनी अप्पासाहेब मोहिते यांस प्रथम मानकरी म्हणून नोकरीत दाखल केले आणि महिना पंधरा दिवसांच्या आत त्यांची नेमणूक नायब खानगी कारभारी अशा हुद्याने खानगीत केली. (तारीख २८-१२-१८९६). हे अप्पासाहेब मोहिते महाराजांचे हेतू अमलात आणण्यासाठी तत्पर होते आणि वेदोक्त प्रकरणात तेच प्रमुख आहेत. ... पुढे

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २२