पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजारामबुवा पुनः आपल्या नोकरीवर रुजू झाले. त्यांजला हा वेदोक्ताचा प्रश्न सोडविण्यास महाराजांनी सांगितले. त्यांनी पुष्कळ निरनिराळ्या शास्त्री मंडळींशी चर्चा करून महाराजांस असे सुचविले की, “वेदोक्तकर्म करण्यास हरकत नाही; परंतु आज पुष्कळ वर्षांचा प्रचार मोडून नवीन उपक्रम करावयाचा आहे; त्यास वाई, नाशिक, काशी वगैरे ठिकाणांहून मोठ-मोठी विद्वान् शास्त्री, पंडित वगैरे मंडळी एकत्र करून त्यांच्या संमतीने हे काम करावे. अशी मंडळी जमा करून योग्य दक्षिणा वगैरे देऊन त्यांचा संतोष केल्याशिवाय ही गोष्ट सिद्धीस जाणार नाही. असे करण्यास निदान लाख दोन लाख तरी खर्च होईल आणि असा खर्च करून महाराजांनी आपला लौकिक वाढविला म्हणजे वेदोक्त यशस्वी होईल." एक प्रकारे ब्राह्मणांना लाच देण्याचाच हा पर्याय होता. परंतु महाराजांनी थेटपणे नाकारला.
 शिवाजी महाराजांनी गागाभट्टाला मुबलक दक्षिणा देऊन आपला पहिला राज्याभिषेक करून घेतला. हा राज्याभिषेक म्हणजे वेदोक्ताच्या संघर्षाचा आरंभबिंदू होता. त्यावेळच्या परिस्थितीमुळे डावपेचाचा भाग म्हणून भरमसाट द्रव्य देऊन हा राज्याभिषेक करावा लागला. यात झालेली द्रव्यहानी भरून काढण्यासाठी सिंहासन कर बसवावा लागला. पुढे वेदोक्त घडले. प्रतापसिंह महाराजांनी शिवाजी महाराजांप्रमाणेच राजपूत वंशावळीचा आधार घेत हे प्रकरण हाताळले. यानंतर घडलेल्या बडोद्याच्या वेदोक्तात सयाजीरावांनी मात्र ब्राह्मणांना

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २३