पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाच देण्याचा पर्याय धुडकारून एकप्रकारे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात झालेली द्रव्य आणि मानहानीची वसुलीच केली. हा इतिहास शिवरायांच्या मावळ्यांना दहा हत्तीचे बळ देणारा आहे. परंतु प्रचंड इतिहास संशोधन होऊनही इतिहासाबाबतच्या 'अज्ञानाच्या डोंगरात' हा लखलखता इतिहास आपल्याला दिसला नाही.
सयाजीराव : कोल्हापूरच्या वेदोक्तातील 'पाठीराखे'
 बडोद्यातील १८९६ मध्ये उद्भवलेले वेदोक्ताचे प्रकरण १९०० ला कोल्हापूर संस्थानात उद्भवले. राजवाड्यावरील सर्व विधी वेदोक्ताऐवजी पुराणोक्त पद्धतीने होतात हे राजारामशास्त्री भागवतांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर शाहू महाराज विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष तीव्र झाला. टिळकांच्या केसरीने राजर्षी शाहूंच्या विरोधात आणि ब्राह्मणांच्या बाजूने हे प्रकरण तापवले. ७ ऑक्टोबर १९०१ रोजी राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले पाहिजेत व जो न करील त्याला दक्षिणा मिळणार नाही असा हुकूम शाहू महाराजांनी काढला. परंतु कोल्हापुरातील ब्राह्मण याला दाद देत नव्हते. पुढे हे प्रकरण १९०५ पर्यंत पेटत राहिले.
 या कालखंडाविषयी आणि या दोन्ही प्रकरणांविषयी शाहू चरित्रकार सूर्यवंशी म्हणतात, “बडोद्याचे राजोपाध्ये राजारामशास्त्री यांनी तेथील वेदोक्त प्रकरणात राजीनामा तरी दिला होता, परंतु कोल्हापूरचे राजोपाध्ये राजीनामाही देत

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २४