पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हते आणि आज्ञापालनही करीत नव्हते. गुळाच्या पीला मुंगळा चिकटून राहावा तसे ते 'वतन व वेतन' यांना चिकटून राहिले होते. त्यांना वतन सोडायचे नव्हते आणि विहित कर्मही करावयाचे नव्हते. “स्वमताभिमानासाठी वतन व वेतन यांवर पाणी सोडा" हा विजापूरकारांनी दिलेला मौलिक उपदेश हा जगाला दाखविण्यासाठी आहे, आचरणात आणण्यासाठी नाही, हे राजोपाध्ये ओळखून होते. ते स्वमताला चिकटून होते, तसेच स्वार्थालाही चिकटून होते. राजारामशास्त्र्यांनी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांचा मार्ग मोकळा केला. अप्पासाहेब राजोपाध्यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींचा मार्ग बिकट केला.”
 वरील चर्चेवरून एक बाब स्पष्ट होते की, एकच प्रकरण हाताळत असताना या दोन राजांच्या धोरणातील फरकामुळे या दोन ठिकाणच्या वेदोक्ताचे परिणाम वेगवेगळे झाले. सयाजीरावांनी या प्रकरणाच्या हाताळणीसाठी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भरपूर वेळ घेऊन योग्य नियोजन केले. त्या तुलनेत बदलासाठी आग्रही असणारे आणि आपल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी भूमिका असणारे शाहू महाराज यांच्या कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट होतो. या ठिकाणी एक बाब नमूद करायला हवी की शाहू महाराजांच्या वेदोक्ताच्या संघर्षात सयाजीराव शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

 त्या संदर्भात दि. के. बेडेकरांचे निरीक्षण एकूणच महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षाचे दिग्दर्शन करते. ते म्हणतात, “१९००

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २५