पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसतात. त्यांच्या आक्रमक स्वभावाला अनुसरून वेगाने आणि कायमचा ब्राह्मणी वर्चस्वाचा हा बुरूज फोडण्यासाठी ते पेटून उठले होते. त्यामुळेच धर्म आणि जातविषयक सुधारणा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ते वेदोक्तानंतर झपाट्याने जवळ करू लागले. म्हणूनच पुढे मग तो सत्यशोधक समाज असो, आर्य समाज असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ब्राह्मण्यांविरुद्धची लढाई असो, शाहू महाराजांचा धर्म आणि सामाजिक सुधारणांना हक्काचा राजाश्रय होता. राजारामशास्त्री भागवत आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी त्यांचे असणारे जिव्हाळ्याचे नाते या लढाईचाच एक भाग होता.
 या सर्व संघर्षात सयाजीराव गायकवाड, खासेराव जाधव, पंडित आत्माराम आणि एकूणच बडोदा संस्थानाशी मार्गदर्शन, तज्ज्ञ, नैतिक पाठबळ किंवा अनुकरणीय उपक्रम याबाबत त्यांचा जवळचा संबंध होता. या संदर्भात शाहू चरित्रकार रमेश जाधव म्हणतात, “शाहू छत्रपतींनी वरील सर्वच धार्मिक चळवळींना कमी-जास्त प्रमाणात पाठिबा दिला होता. परंतु या सर्वच समाजांकडून त्यांना हवी असणारी नवसमाजरचना निर्माण होणे थोडे अवघड वाटत होते. म्हणून या सर्व समाजाच्या संदर्भातील आपली नापसंती त्यांनी आपले बडोद्याचे ज्येष्ठ मित्र- की ज्यांना शाहू छत्रपती गुरुस्थानी मानीत होते, त्या खासेराव जाधवांना शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर १९२० रोजी लिहिलेल्या सविस्तर पत्रात पाहावयास सापडते.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २७