पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या पत्रात आर्य समाजासंबंधी ते सांगतात, “मूर्तिपूजा आमच्यात चालू आहेच. म्हणून आर्यसमाज मला माहीत नाही." यापुढे आपला स्वभाव कसा स्वाभिमानी आहे हे सांगताना ते आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना नमूद करतात. ते लिहितात, “जरी खुद्द परमेश्वराला मी नको असलो तर मी त्याच्याकडे जाणार नाही. अर्थातच ज्यांना मी नको त्यांच्याकडे जाणार नाही. उदाहरणार्थ बरेच दिवस मी प्रयागातील संगम पोहून त्या देवाच्या दर्शनास जात असे. एके दिवशी उन्हाळ्यात मी पोहत असताना माझे पाय धोतरात अडकले. त्याच रात्री मला दृष्टांत झाला की, माझ्या दर्शनास येऊ नको. त्या दिवसापासून मी त्या देवाच्या दर्शनास जात नाही.”
खासेराव जाधव : सयाजीराव - शाहूंमधील 'क्रांतिकारक' दुवा

 राजर्षी शाहू आणि खासेराव यांच्यातील नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. कित्येक प्रसंगी शाहू महाराज खासेरावांना खाजगी पत्रे लिहून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असत. १९१६-१७ मध्ये सयाजीरावांची नात इंदुमती आणि शाहू महाराजांचे पुत्र राजाराम यांच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. परंतु ती फारच ताणली गेली होती. त्यावेळी हा विवाह ठरणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खासेराव खूपच अस्वस्थ झाले होते. शाहू आणि सयाजीराव या दोघांचीही मने वळवण्यासाठी त्यांनी खूप धावपळ केली. यामागे या दोन

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २८