पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजांमधील जुन्या नातेसंबंधांना या लग्नाने नवा उजाळा मिळावा ही खासेरावांची तळमळ होती.
 खासेरावांचे सयाजीराव आणि शाहू या दोघांच्यावर अतूट प्रेम होते. राजर्षी शाहू खासेरावांना गुरुस्थानी मानत होते. त्यामुळे खासेराव हा या दोघांना जोडणारा दुवा होता. हा दुव महाराष्ट्राच्या उत्कर्षाला लाभदायक ठरला असे इतिहास सांगतो. शाहू महाराज ज्या खासेराव जाधवांना गुरुस्थानी मानत होते ते खासेराव जाधव सयाजीरावांचे नातेवाईक आणि विश्वासू अधिकारी होते. राजर्षी शाहू बऱ्याचदा आपले मन मोकळे करण्यासाठी खासेरावांना पत्र लिहीत असत. त्याचप्रमाणे सयाजीरावही आपले मन मोकळे करण्यासाठी खासेरावांशी बोलत असत. बऱ्याचदा शाहू महाराज काही बाबींची चर्चा थेट सयाजीरावांशी न करता खासेरावांशी करत असत. एक प्रकारे सयाजीराव आणि शाहू महाराजांना जोडणारा एक विश्वासू आणि क्रांतिकारक दुवा अशीच खासेरावांची भूमिका होती.
 १९०१ मध्ये सयाजीरावांनी शाहूंना लिहिलेल्या एका पत्रात वेदोक्त प्रकरणातील सहकार्यासंदर्भात चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे याच पत्रात सयाजीराव शाहूंना वडीलकीच्या नात्याने मार्गदर्शन करतानाही दिसतात. या पत्रात सयाजीराव म्हणतात, “आपण विलायतेस जाल तेव्हा युरोप खंडातील चित्तवेधक स्थळे व संस्था पाहण्याची संधी केव्हाही दवडू नये. अशा संस्थांचे निरीक्षण केल्याखेरीज पाश्चात्य देशांत त्या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २९