पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरनिराळ्या संस्कृती उपलब्ध आहेत, त्यांचे तुलनात्मक ज्ञान संपादिता येणार नाही. आपण ज्या कार्याला उदार अंतःकरणाने चालन दिले आहे, ते मी विसरलो नाही व पुढेही विसरणार नाही. आम्हाला थोडीशी अनुकूल परिस्थिती प्राप्त होण्याची मी वाट पाहत आहे. आपण आमच्या लोकांच्या कल्याणाचे कामी जे लक्ष घालीत आहात, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो.”
 १८८७ च्या पहिल्या युरोपवारीत सयाजीरावांनी तुलनात्मक विचाराचे महत्त्व स्वअनुभवातून जाणले. पुढे आयुष्यभर त्यांनी हा वसा जपला. तुलनात्मक विचारपद्धतीमुळे आपल्या विचाराला संतुलन लाभते. त्याचप्रमाणे आंधळ्या अनुकरणापेक्षा आपल्या परिस्थितीनुसार इतरांकडून काय आणि कसे स्वीकारावे याची दृष्टी लाभते. याच भूमिकेतुन सयाजीरावांनी शाहूंना वरील 'वडीलकीचा सल्ला दिला होता.
बडोदा : कोल्हापुरातील सामाजिक सुधारणांचा 'रोडमॅप'
 सामाजिक सुधारणेबाबत शाहूंच्या पुढे बडोद्याचा आदर्श कसा होता याचा आणखी एक उत्तम पुरावा म्हणजे ९ मे १९१८ रोजी शाहू महाराजांनी सयाजीरावांना लिहिलेले इंग्रजी पत्र. या पत्रात बडोद्यातील शिक्षण निरीक्षक म्हणून काम करणारे आर्य समाजाचे कार्यकर्ते पंडित आत्माराम हे बडोद्याच्या सेवेतून कोल्हापुरात शैक्षणिक काम पाहण्यासाठी हवे असल्याचे शाहू महाराजांनी सयाजीरावांना लिहिले होते. त्याचप्रमाणे याच पत्रात बडोद्यातील जमीन विभाजनासंदर्भातील कायदा हवा असल्याचे लिहिले होते.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३०