पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या पत्राला उत्तर देताना १२ मे १९१८ रोजी 'शाहू महाराजांना लिहिलेल्या पत्रात सयाजीरा म्हणतात,“पंडित आत्माराम यांच्या संदर्भातील आपल्या दि. ९ मे रोजीच्या पत्राबाबत धन्यवाद. आत्माराम हे शिक्षण खात्यातील एका महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना तुमच्याकडे पाठवता येत नाही. तुमची खूपच इच्छा असेल, तर त्यांना काही दिवस तुमच्या इच्छा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे पाठविण्यास मी माझ्या मंत्र्यांना सांगितले आहे. तुम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी एखाद्या आर्य समाजी व्यक्तीला पंजाब किंवा मुंबईवरून आमंत्रित करायला हवे. तुम्ही पं. आत्माराम यांना काही नावे सुचवण्यास सांगू शकता. तुमचे दि. ९ मे रोजीचे मराठीतील पत्रही मला मिळाले. जमिनीच्या विभाजनाबद्दचा कायदा अद्याप पास झालेला नाही, तो पास झाल्यानंतर त्यासंदर्भात तुम्हाला माहिती पाठवण्यास मी माझ्या मंत्रिमहोदयांना सांगितले आहे.” या पत्रातील मजकुरावरून कोल्हापुरातील सामाजिक सुधारणांमधील बडोद्याचा 'मार्गदर्शक' संदर्भ पुढे येतो.
 आधुनिक महाराष्ट्राच्या मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वप्रथम आणि सर्वाधिक योगदान देणारे गंगारामभाऊ म्हस्के यांनी १८८५ मध्ये पुण्यात मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन' या संस्थेची स्थापना केली. मराठा जातीतील पहिली उच्च शिक्षण घेतलेली पिढी म्हस्केंमुळे तयार झाली.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३१