पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(i.e. programme of introducing Free and Compulsory Primary Education in the State) done in my life time and follow Your Highness.” यावरून शाहू महाराजांनी सयाजीरावांना आपले आदर्श म्हणून स्वीकारले होते हे सिद्ध करते.
धार्मिक सुधारणा : बडोदा - कोल्हापूर 'सहसंबंध'
 बडोद्यातील धर्म सुधारणांमध्ये वेदोक्त प्रकरण हा एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण १८९६ च्या बडोद्यातील वेदोक्ताच्या अगोदर १४ वर्षे म्हणजेच १८८२ मध्येच सयाजीरावांनी धर्म सुधारणांचे काम हाती घेतले होते. दरम्यान सयाजीरावांनी धर्मसुधारणा सुरू केल्या होत्या. सयाजीरावांनी ब्राह्मण आणि मुसलमान यांना धर्मकार्य म्हणून वाटली जाणारी खिचडीसाठीची तांदूळ आणि डाळ यातील सावळा गोंधळ दानधर्माचा नियम करून संपवला होता. अन्नदान करायचेच असेल तर ते गरजू, अंध, अपंग, अनाथ यांना करण्यासाठी पास देण्याची व्यवस्था करून सरकारी खजिन्याची लूट थांबवली होती. हीच परंपरा राजर्षी शाहूंनी पुढे ३८ वर्षांनी स्वीकारल्याचा पुरावा २२ ऑक्टोबर १९२० मध्ये शाहू महाराजांनी बडोद्याच्या खासेराव जाधवांना लिहिलेल्या पत्रात आढळतो.

 या पत्रात “आपण कोल्हापूर संस्थानामार्फत पंढरपूरच्या देवस्थानासाठी नैवेद्य इत्यादींवर होणारा खर्च बंद करून त्याचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावा असा हुकूम

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३६