पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिल्याचे” मोठ्या समाधानाने शाहू महाराज सांगतात. शिक्षण आणि धर्मसुधारणा ही समाज प्रगतीच्या रथाची दोन चाके आहेत हे फुल्यांपासून सर्वच समाजसुधारकांच्या सामाजिक विचारांचे सार आहे हे आपण जाणतोच. ज्याप्रमाणे कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक प्रगतीसाठी पंडित आत्माराम यांची मदत शाहू महाराज घेत होते त्याचप्रमाणे धर्मसुधारणेतही आत्माराम हे शाहूंच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण सयाजीरावांनी बडोद्यातील अस्पृश्यांच्या शिक्षणाच्या कामात आणि धर्मसाक्षरतेच्या उपक्रमात पंडित आत्माराम यांच्याकडून करून घेतलेले उत्तम काम शाहूंच्या समोर होते.
 शाहूमहाराजांनी आपल्या जनक घराण्यातील चुलत बहिणीचा विवाह इंदूरच्या होळकर या संस्थानात घडवून आणण्यासाठी १९१८ पासून खूप प्रयत्न केले होते. राजर्षी शाहूंच्या हयातीत हा विवाह ठरला आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो विवाह झाला. या विवाहाची प्रेरणासुद्धा बडोदाच होती. सयाजीराव महाराजांच्या कन्या इंदिराराजे यांनी कूचबिहार या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वतः ठरविला होता. हा विवाह १९९३ ला झाला. हा फक्त आंतरजातीय विवाह नव्हता तर मराठा - आदिवासी विवाह होता हे महाराष्ट्राला माहीत नाही. आधुनिक भारतातील जातीअंताच्या चळवळीला सर्वाधिक प्रेरणा देणारा हा पहिला अशा प्रकारचा विवाह ठरतो.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३७