पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातिव्यवस्था मोडण्यासाठी आंतरजातीय विवाहाचे महत्त्व वेदोक्तानंतर १८ वर्षात शाहू महाराजांना पटले होते. त्यामुळेच या विवाहातून प्रेरणा घेऊन शाहूंनी आपल्या घराण्यात आंतरजातीय विवाह घडवून आणला असे म्हणता येईल. याबरोबरच शाहू महाराजांनी २३ फेब्रुवारी १९१८ मध्ये आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदाही केला होता. या कायद्याअगोदर १७ वर्षे अशाच प्रकारचा कायदा १९०१ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा या नावाने सयाजीरावांनी बडोद्यात केला होता.
 शाहूंनी आंतरजातीय विवाहाचा कायदा करण्याअगोदर २० दिवस म्हणजे ३ फेब्रुवारी १९१८ ला बडोद्याच्या खासेरावांना शाहू महाराजांनी पुढील पत्र लिहिले होते. या दीर्घ पत्रात शाहू महाराज म्हणतात, “... खामगावच्या भाषणात जातिभेद मोडले पाहिजेत असे मी बोलून गेलो, "बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले” अशी तुकारामाची आहे. त्या दिशेने काही करावे अशा विचाराने आर्य समाजाची उक्ती म्हणजे वस्तुत: वैदिक धर्माची शाखा स्थापन केली. निरनिराळ्या जातींचा बेटीव्यवहार तुरळक आहे. मराठ्यांत मात्र जरा जास्त आहे. म्हणून आपल्या धर्माचा वैदिकपणा कायम ठेवून जातींचा अडथळा कमी करण्याला आर्य समाज सध्याच्या काळी चांगले साधन आहे असे वाटते. ... हल्लीच्या काळीसुद्धा क्षत्रिय मराठ्यांचे संबंध शूद्रांशी झालेले आहेत. कूचबिहारशी तर आमचा संबंध

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३८