पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालाच आहे. ... सबब या निरनिराळ्या भेदातील हिंदू राजांनी आर्य समाजाच्या विधीप्रमाणे परस्परांत शरीर संबंध केले तर त्यांचे हिंदुत्व तर कायम राहिलच, इतकेच नव्हे तर खऱ्या वैदिक धर्माचे संरक्षण व संवर्धन त्यांच्याकडून झाले असे होईल. हल्लीचे 'लग्नसुद्धा वैदिक पद्धतीप्रमाणे होण्यास मला काहीच हरकत दिसत नाही. तरी या संबंधाने आपले विचार काय आहेत हे मला कळवावे. आपल्या महाराजांचे व कूचबिहारसारख्या राजांचे विचार माझ्याप्रमाणेच पडतील अशी मला फार आशा वाटते.” खासेरावांना लिहिलेले हे खाजगी पत्र शाहूंच्या मृत्यूच्या ४ वर्षे अगोदरचे आहे.
 जीवनाच्या उत्तर काळात शाहू महाराज अस्पृश्यता निवारणाबरोबर जातीअंताकडे वळले होते हे यातून स्पष्ट होते. कारण बडोद्याच्या पंडित आत्मारामांना शाहू महाराजांनी कोल्हापूरला बोलावून १९९९ मध्ये राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यास दिले होते. आत्मारामांच्या नेतृत्वाखाली बडोद्यात अस्पृश्यांच्या शिक्षणाचे कार्य उत्तमरीत्या चालू असल्याचे शाहूंना माहीत होते. त्यामुळे कोल्हापुरातील शिक्षण आणि अस्पृश्योद्धार या दोन्ही कामांसाठीचा हुकमी आधार याच भूमिकेतून शाहू महाराजा बडोद्याकडे पाहात होते. अस्पृश्यांच्या उद्धाराच्या शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श बडोदा होता हे सूर्यवंशींच्या पुढील विधानाच्या आधारेही स्पष्ट करता येईल. “मागासवर्गीयांच्या शैक्षणिक व इतर उन्नतीच्या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३९