पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भात आर्यसमाज विशेष प्रयत्नशील असल्याचे महाराजांना आढळून आले.” या संदर्भात बडोद्याकडून त्यांना प्रेरणा आणि नैतिक पाठबळ मिळत होते हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होते.
सयाजीराव - शाहू : 'दुर्लक्षित' पत्रव्यवहार

 महाराजा सयाजीराव आणि शाहू महाराज यांच्यात झालेला पत्रव्यवहार पुरोगामी महाराष्ट्राच्या संघर्षगाथेतील एक ऊर्जादायी 'प्रेरणाप्रवास' आहे. या पत्रव्यवहारात शाहूंनी ब्राह्मणी व्यवस्थेशी केलेल्या संघर्षात बडोद्याने दिलेले 'बळ' अधोरेखित होते. हे बळ शाहूंच्या एकाकी झुंजीत 'देवदूता'चे काम करणारे ठरले. कोल्हापुरातील आणि पुण्यातील ब्राह्मण समुदायाशी वेदोक्तापासून चालू असलेला शाहूंचा संघर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत अखंड सुरू होता. याचा परिणाम म्हणून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला मुंबई विद्यापीठाची कायमस्वरूपी मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे राजर्षी शाहू अस्वस्थ होते. मृत्यूपूर्वी २ महिने म्हणजे २३ मार्च १९२२ ला त्यांनी 'सयाजीरावांनी लक्ष घालून राजाराम कॉलेजला कायमस्वरूपी मान्यता मिळवून देण्याच्या कामात सहकार्य करावे. या कामी सयाजीरावांनी आपला प्रभाव वापरल्यास त्यांचा मी कृतज्ञ राहीन' या आशयाचे पत्र सयाजीरावांना लिहिले होते. यानंतर लगेचच राजाराम कॉलेजला कायमस्वरूपी मान्यता मिळाली हे विसरता येणार नाही. याअगोदर राजाराम कॉलेज चालवायला घ्यावे अशी विनंती शाहू महाराजांनी बडोद्याच्या खासेरावांनाही केली होती.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४०