पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कायदा मोडल्यासारखे होईल. " केवळ हुकुमाद्वारे समाजात बदल घडवण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता रूढ असणाऱ्या काळात स्वतः केलेल्या कायद्याचे काटेकोर पालन करण्याचा सयाजीरावांचा आग्रह त्यांच्यातील लोकशाहीवादी प्रशासकाची साक्ष देतो.
 १४ डिसेंबर १९१६ रोजी इंदुमतीदेवींच्या आईंना लिहिलेल्या पत्रात महाराणी लक्ष्मीबाईंनी विवाहासाठीच्या वरपक्षाच्या अटी सविस्तरपणे मांडल्या. या पत्रात महाराणी लक्ष्मीबाई लिहितात, “२ लाख हुंडा, १ लाख वरासाठी एक गाव वतन, १ लाख वधूसाठी एक गाव वतन, १ लाख वधूस दागिने, ७० हजार वाटखर्चासाठी व फक्त व वऱ्हाडी मंडळीचा वरखर्च, असे एकूण ६,७०,००० आपण आम्हास द्यावे. आम्ही तेथे आलो म्हणजे वाहन, भांडीकुंडी, फरासी सामान, मांडव, लाईट सोय ठरल्याप्रमाणे व्हावी. श्रीमन्महाराजसाहेब गायकवाड यांनी मुलीच्या स्त्रीधनाविषयी पत्रात लिहिले. आमच्याकडे कोल्हापूरला ती पद्धत नाही. आपल्यासारख्या थोरांनी आमच्याकडून स्त्रीधनाची इच्छा धरू नये.” सयाजीरावांनी स्त्री धनाची अपेक्षा धरू नये अशी भूमिका या पत्रात शाहू पक्ष घेतो. मात्र हुंड्यासाठी तो टोकाचा आग्रही राहतो ही बाबसुद्धा अचंबित करणारी आहे. विवाह समारंभात वरपक्षाचा मान-पान राखणे आवश्यक असले तरी हुंड्याच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी करणे योग्य नसल्याचे परखड मत सयाजीरावांनी मांडले.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४६