पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याच दरम्यान ११ जुलै १९१७ रोजी खासेरावांना लिहिलेल्या पत्रात राजर्षी शाहू म्हणतात, “आम्ही मागणी केलेले ६,७०,००० द्यायचे बडोदा महाराजांनी मान्य केले आहे; पण माझी काय इच्छा आहे, हे आपणास सांगितलेच पाहिजे. जर वधू आणि वरास प्रत्येकी आणखी पन्नास हजार दिले तर चांगले दिसेल आणि किरकोळ खर्चासाठी म्हणून तीस हजार रुपये वाढवून द्यावेत. या प्रकारे एकूण आठ लक्ष रुपये होतील. तुमच्याकडे आम्ही मूळ मागणी अकरा लक्ष रुपयांची केली होती, त्याहून हे तीन लाखाने कमीच आहेत. नंतर आम्ही महाराजांना आणखी त्रास देणार नाही, एवढे मिळाल्यास ते अधिक चांगले (look decent) आणि योग्य होईल. "
 याच दिवशी सयाजीरावांना पाठवलेल्या मराठी पत्रात शाहू महाराज लिहितात, "इकडून मि. शिरगावकर व खासेराव यांना पत्रे पाठविली आहेत त्यावरून इकडील इच्छा वडिलास श्रुत झाली आहे. त्याचा विचार होऊन आमचे म्हणणे मान्य झाल्याबद्दल उत्तर येईल अशी आशा आहे. फरक फार नाही. मी आपल्या इच्छेबाहेर गेलो नाही व जाण्याची इच्छा नाही; परंतु माझे म्हणण्याबद्दल आपल्याकडून अनुकूल विचार झाला पाहिजे. म्हणजे व्यवहारदृष्ट्या सर्वांना लौकिकास चांगले दिसेल." या पत्रातील राजर्षी शाहूंचे 'इकडील इच्छा वडिलास श्रुत झाली आहे' हे वाक्य सयाजीरावांचे शाहूंच्या जीवनातील वडीलधारे स्थान सिद्ध करते. दुर्दैवाने आजही हा इतिहास ' कुलूपबंद'

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४७