पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवण्याचा अट्टाहास केला जातो. हा हट्ट आपण सोडला नाही तर पुरोगामी परंपरेचे डबके अधिक विषारी होईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतील याचे भान आपल्या इतिहास संशोधकांना आता ठेवावे लागेल.
 राजर्षी शाहूंच्या या पत्राला पाठवलेल्या उत्तरात सयाजीराव लिहितात, “आपण मूळ मागणी केलेल्या सर्व गोष्टी आम्ही मान्य केलेल्या आहेत. आता आपण वाढीव मागणी करत आहात. ते मान्य करणे शक्य नाही. सासरच्या मंडळीने वधूला 'स्त्रीधन' देण्याची पद्धत आहे. आपण याबद्दल काही कळविले नाही.” सयाजीरावांच्या या पत्रानंतर शाहू महाराजांनी दोन पत्रे लिहिली. सयाजीरावांना पाठवलेल्या पत्रात राजर्षी शाहू लिहितात, "कोल्हापूर राजघराण्यात स्त्रीधन देण्याची पद्धत नाही. आता आपण नवे प्रश्न उभे करू नये." तर खासेरावांजवळ मन मोकळे करण्यासाठी पाठवलेल्या पत्रात शाहू महाराज लिहितात, “इथे पैसा महत्त्वाचा नाही. सयाजीराव महाराजांच्या या नव्या प्रश्नांनी जुळत असलेला हा नातेसंबंध तुटण्याचा संभव आहे. असे काही झाले तर त्याचे पाप माझ्या माथी बसेल, सगळे मलाच दोष देतील, स्त्रीधनाचा प्रश्न आपण लग्नाच्या वेळी समोरासमोर बडोद्यात निकाली काढू.”

 राजर्षी शाहूंसारखा क्रांतिकारक समाजधुरीण कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी हुंड्यासारख्या अतिशय छोट्या घटनेला इतकी वर्षे आग्रही महत्त्व देतो ही बाब अचंबित करणारी आहे. कर्मठ

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४८