पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूढीपरंपरा, खोटी प्रतिष्ठा, जातश्रेष्ठत्वाची भावना यासारख्या बाबींवर मात करण्यात राजर्षी शाहू पूर्ण यशस्वी झाले नव्हते असेच यावरून म्हणावे लागते. शाहूंच्या पुरोगामित्वाचा विचार करता शिवरायांच्या गादीचे वारसदार म्हणून वेदोक्ताच्या निमित्ताने दुखावलेल्या अहंकारामुळे वेदोक्ताचा संघर्ष आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्या माध्यमातून ब्राह्मणांवर सूड उगवण्यासाठी शाहू महाराज मृत्यूपर्यंत झुंजत राहिले. परंतु त्यांना ब्राह्मणी वर्चस्वावर पूर्ण विजय मिळवता आला नाही. तसेच परंपरेच्या पगड्यातूनसुद्धा त्यांना पूर्ण मुक्त होता आले नाही असेच दिसते.
 याउलट सयाजीरावांनी मात्र ज्ञान, व्यावहारिक शहाणपण, विद्वानांचा सहवास आणि शिवरायांचा गनिमी कावा यांचा अनोखा मेळ घालत होते. १९१५ मध्ये पुरोहित कायद्याद्वारे सर्व हिंदूंना समान धार्मिक अधिकार बहाल करून ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार स्वतःकडे घेऊन सयाजीरावांनी ब्राह्मणी व्यवस्थेला लावलेला 'सुरंग' पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल इतका क्रांतिकारक होता. सयाजीरावांनी प्रतिक्रिया किंवा सूड उगवणे या उद्देशाने कोणतेच काम केले नाही तर समाजातील सर्व घटकांना ज्ञानाधिष्ठित करून अधिक सकारात्मक पद्धतीने समाज उभारणीवर त्यांनी भर दिला हेसुद्धा आपल्याला गंभीरपणे समजून घ्यावे लागेल.
 गेल्या ६०-७० वर्षात पुरोगामी परंपरा निर्माण करण्याच्या नावाखाली महापुरुष भक्तीचा ' महासंप्रदाय'

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४९