पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एक चलनी 'नाणे' बनला. या प्रक्रियेत आपण या महापुरुषांना राम आणि कृष्णाप्रमाणे भक्तीसागरात कधी बुडवून टाकले हे लक्षातसुद्धा आले नाही. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांची फक्त मंदिरे बांधण्याचे काम बाकी आहे इतकी आपली पुरोगामी परंपरा वेगाने भरकटली. परिणामी महापुरुषांच्या मर्यादा स्वीकारण्याचे आत्मबल आपण गमावून बसलो. या सर्व महापुरुषांचा 'पितामह' असणारा 'ऊर्जापुरुष' महाराजा सयाजीराव गायकवाड यांना तर आपण बहिष्कृतच करून टाकले.
 महापुरुषांच्या मर्यादा सांगण्याचे धैर्य जर त्या महापुरुषाच्या अनुयायांमध्ये नसेल तर त्या महापुरुषाचा पराभव करण्यासाठी प्रतिपक्षाची गरज लागत नाही. म्हणूनच या विवाहाच्या निमित्ताने हुंड्यासाठी झालेला हा संघर्ष शाहू महाराजांची मर्यादा म्हणून आपण सर्व शाहू अनुयायांनी स्वीकारण्याची गरज आहे. या बाबी झाकून ठेवून इतिहास बदलणार नाही. महापुरुष हाही हाडामासांचा एक जिवंत माणूस असतो याचे भान मुख्यतः संशोधकांनी ठेवणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे किंमत मोजण्याची हिंमत नसेल तर संशोधनाच्या वाटेला न गेलेलेच बरे इतकाच बोध या प्रसंगाच्या निमित्ताने आपण घेऊ शकतो.

 प्राचार्य व. वा. देशमुख यांनी फुले - सयाजीराव, शाहू- आंबेडकर हे नवे वैचारिक प्रारूप स्वीकारण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांची ही नवी भूमिका महाराष्ट्राने स्वीकारल्या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ५०